छत्रपती संभाजीनगरचा अव्वल धावपटू तेजस शिर्से याने 110 मीटर अडथळा शर्यतीत दमदार कामगिरी करत स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. पंजाबमधील लुधियाना येथील गुरु नानक स्टेडियमवर आयोजित इंडियन ॲथलेटिक्स सिरीज-9 स्पर्धेत तेजसने 13.27 सेकंदांची वेळ नोंदवत नवा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी मे 2024 मध्ये फिनलंडमधील जैवस्किला येथे झालेल्या मोटोनेट जीपी मीटमध्ये त्याने 13.41 सेकंदांचा विक्रम केला होता.
रिलायन्स फाउंडेशनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तेजसने 110 मीटर हर्डल्स रेस-बीमध्ये सुरुवातीपासूनच आघाडी घेत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. कृष्णिक एम याने त्याला कडवी झुंज दिली, मात्र शेवटच्या अडथळ्याला धडक लागूनही तेजसने वेग कायम ठेवत 13.27 सेकंदांत शर्यत पूर्ण केली आणि पहिले स्थान पटकावले. कृष्णिक एम 13.55 सेकंदांसह दुसऱ्या, तर राजस्थानच्या माधवेंद्र सिंगने 14.00 सेकंदांसह तिसरे स्थान मिळवले.
या शानदार कामगिरीमुळे तेजसने 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी आवश्यक असलेली 13.39 सेकंदांची पात्रता वेळ पार केली आहे. त्यामुळे स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होण्याची त्याची संधी अधिक बळकट झाली आहे.
दुखापतीमुळे काही काळ ट्रॅकपासून दूर राहिल्यानंतर तेजसने उल्लेखनीय पुनरागमन केले आहे. यापूर्वी त्याने रांची येथे झालेल्या फेडरेशन कप 2026 मध्ये सुवर्णपदक पटकावले होते. तसेच 13.27 सेकंदांची वेळ नोंदवत त्याने आशियातील सहावी सर्वोत्तम कामगिरीही आपल्या नावावर केली आहे. भारतीय संघात निवड झाल्यास 2014 नंतर राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणारा तो पहिला भारतीय पुरुष 110 मीटर हर्डलर ठरणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*