छत्रपती संभाजीनगर : शहरातील चौक, सिग्नल आणि गल्लोगल्ली भिक्षा मागणाऱ्यांची वाढती संख्या ही प्रशासनासमोर मोठी समस्या बनली होती. मात्र, आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारच्या ‘स्माइल’ (SMILE) योजनेअंतर्गत शहरातील सुमारे २०० भिक्षेकरूंचे पुनर्वसन करण्यात येणार असून, त्यांना व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शहरातील विविध चौकांमध्ये, सिग्नलवर आणि सार्वजनिक ठिकाणी भिक्षा मागणारे महिला, पुरुष, तरुण तसेच बालक मोठ्या प्रमाणात आढळून येतात. वाहनचालक किंवा पादचाऱ्यांकडे पैसे मागून उदरनिर्वाह करणाऱ्या या घटकांच्या पुनर्वसनासाठी केंद्र शासनाने विशेष योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. दारिद्र्य, सामाजिक परिस्थिती आणि इतर कारणांमुळे भिक्षावृत्तीकडे वळलेल्या व्यक्तींना सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत देशातील निवडक शहरांमध्ये सर्वेक्षण आणि पुनर्वसन मोहीम राबविण्यात येत असून, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहराची निवड करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण करून भिक्षेकरूंसाठी कार्य करणाऱ्या ‘उम्मीद’ संस्थेची नियुक्ती केली आहे. संस्थेमार्फत सध्या शहरातील भिक्षेकरूंचे सर्वेक्षण सुरू असून, त्यांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीची माहिती संकलित केली जात आहे.
सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तींना निवारा, समुपदेशन, कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून ४८ लाख ७० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी सांगितले की, “भिक्षा मागणाऱ्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी नियुक्त संस्थेकडे राहणार आहे. कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी बनवून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न केला जाईल.”
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*