छत्रपती संभाजीनगर : उन्हाळी सुट्टीनंतर जिल्हा परिषदेसह मराठी माध्यमांच्या शाळांना आज, सोमवार (दि. १५) पासून सुरुवात होत असून, नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या २ हजार ९० शाळांमधील सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली असून, प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.

प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळांच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरण मिळावे यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सव साजरा केला जाणार असून, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध शाळांमध्ये उपस्थित राहणार आहेत.

जिल्हाधिकारी विनय गौडा हे जळगाव मेटे येथील शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत, तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. या वरवंडी तांडा क्रमांक २ येथील शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील ६८ वरिष्ठ अधिकाऱ्यांना विविध शाळांचे वाटप करण्यात आले असून, तेही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये परिसर स्वच्छता, वर्गखोल्यांची सजावट, स्वागत कमानी आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पुस्तकांची व शालेय साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्येही चांगलीच लगबग पाहायला मिळत आहे.

दरम्यान, शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश मिळावा यासाठी शाळा व्यवस्थापन समित्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. यासोबतच सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटपही करण्यात येणार आहे. त्यामुळे नव्या उत्साहाने आणि नव्या उमेदीनिशी जिल्ह्यातील लाखो विद्यार्थी आजपासून शिक्षणाचा श्रीगणेशा करणार आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

218 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क