छत्रपती संभाजीनगर : गणेशभक्तांसह सर्वसामान्य प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) छत्रपती संभाजीनगर विभागाकडून मंगळवारपासून मध्यवर्ती बसस्थानक ते श्री क्षेत्र राजूर गणपती दरम्यान अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ‘राजमाता जिजाऊ’ शटल बससेवा सुरू करण्यात येणार आहे. या सेवेमुळे राजूरला जाणाऱ्या भाविकांना तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित, आरामदायी आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
एसटी महामंडळाने नुकताच ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा शुभारंभ केला असून छत्रपती संभाजीनगर विभागात अशा पाच नव्या बस दाखल झाल्या आहेत. गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये, यासाठी या बसमध्ये ३ बाय २ आसनरचनेसह ५५ आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी ६ वाजल्यापासून दुपारी ३.३० वाजेपर्यंत दर तासाला बस सुटणार आहे. या बसचा मार्ग हर्सूल टी-पॉइंट, चौका, फुलंब्री, पाल फाटा, पीर बाबडा, दाभाडी आणि चनेगाव या प्रमुख ठिकाणांवरून जाणार असून सर्व ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे मार्गावरील नागरिकांनाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
नवीन बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चार सीसीटीव्ही कॅमेरे, मार्गावरील माहिती देणारी अनाउन्समेंट सिस्टम तसेच मोबाईल चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या बसमुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.
याबाबत माहिती देताना विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी सांगितले की, “मध्यवर्ती बसस्थानकातून राजूरसाठी शटल बस मंगळवारपासून सुरू होत असून ती सर्व नियोजित थांबे घेणार आहे. या सेवेमुळे भाविक, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांची मोठी सुविधा होणार आहे.”
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*