छत्रपती संभाजीनगर : बायपास परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. आकाश बबन भालेराव (वय २४, रा. आलोकनगर, सातारा परिसर) असे मृत तरुणाचे नाव असून, या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश भालेराव हा एका खासगी कंपनीत काम करत होता. शनिवारी रात्री काम आटोपून तो दुचाकीवरून घरी परतत होता. रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास बायपास रोडवरील हॉटेल निसर्गसमोर तो काही कामानिमित्त रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून रस्ता ओलांडत होता. त्याच वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने त्याला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, आकाश आणि धडक देणारा दुचाकीस्वार दोघेही अनेक फूट दूर फेकले गेले. अपघातात आकाशच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, धडक देणारा दुचाकीस्वारदेखील गंभीर जखमी झाला असून, स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
आकाश हा स्वभावाने मनमिळाऊ आणि कष्टाळू तरुण म्हणून ओळखला जात होता. दोन वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आली होती. घरातील मोठा मुलगा असल्याने तो कुटुंबाचा आधारस्तंभ बनला होता. विशेष म्हणजे, अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच त्याच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. नव्या आयुष्याच्या आनंदात असलेल्या कुटुंबावर या दुर्दैवी अपघातामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*