छत्रपती संभाजीनगर : गेल्या दोन ते तीन वर्षांपासून घरातील सदस्याप्रमाणे वावरणाऱ्या आणि चालक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने मालकिणीचा विश्वासघात करत तब्बल ५ लाख रुपयांची रोकड आणि मालकाची स्कुटी घेऊन पलायन केल्याची धक्कादायक घटना सातारा परिसरातील डिलक्स पार्क येथे घडली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

प्रणय सतीशराव देशमुख (वय २६, रा. तेल्हारा, जि. अकोला) असे आरोपीचे नाव आहे. तर, प्रणिता दीपक पुराणिक (वय ५०, रा. डिलक्स पार्क, सातारा परिसर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणिता पुराणिक या कॉस्मेटिक खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या घरी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्रणय देशमुख हा चालक म्हणून कार्यरत होता. व्यवसायातील विविध कामे तसेच बँकेचे व्यवहार यासाठी पुराणिक कुटुंब त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवत होते.

दि. २० जून रोजी दुपारी सुमारे अडीच वाजेच्या सुमारास प्रणिता पुराणिक या व्यावसायिक कामानिमित्त ५ लाख रुपयांची रोकड एका कापडी पिशवीत घेऊन बाहेर पडल्या. त्यांनी ही रक्कम त्यांच्या स्कॉर्पिओ वाहनात ठेवली आणि चालक प्रणय याला गाडी काढण्यास सांगितले. मात्र, त्यानंतर त्यांना स्वतःचा मोबाईल घरातच विसरल्याचे लक्षात आल्याने त्या तो आणण्यासाठी घरात गेल्या.

काही मिनिटांनंतर त्या बाहेर आल्या असता, आरोपी प्रणय हा त्यांच्या पतीच्या मालकीची स्कुटी (एमएच-२०-एचआर-७१६४) घेऊन जाताना दिसला. त्यांनी त्याला हाक मारली असता, “आई, लगेच आलो,” असे सांगत त्याने तेथून पलायन केले. संशय आल्याने प्रणिता यांनी स्कॉर्पिओची तपासणी केली असता, गाडीतील ५ लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी गायब असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार राहुल रणवीर करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

513 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क