छत्रपती संभाजीनगर : “माझे अनेक मंत्र्यांशी संबंध आहेत. तुला सरळसेवा भरतीअंतर्गत अन्न व नागरी पुरवठा विभागात निरीक्षकपदी नोकरी लावून देतो,” अशी बतावणी करून विद्युत विभागातील एका कंत्राटी कर्मचाऱ्याची तब्बल २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अभिषेक अजय सावरीकर (रा. मॉडर्न कॉलनी, पुणे) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप काळुसे (वय ३१, रा. किनगाव राजा, जि. बुलढाणा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. संदीप यांची संशयित अभिषेक सावरीकर याच्याशी २०२३ मध्ये एका कार्यक्रमादरम्यान ओळख झाली होती. त्यावेळी अभिषेकने अन्न व नागरी पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षक पदावर नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी २१ लाख रुपये खर्च येईल, असे सांगत त्याने संदीप यांचा विश्वास संपादन केला.
विश्वास बसावा यासाठी आरोपीने मंत्र्यांचे बनावट शिफारसपत्र तसेच बनावट नियुक्ती आदेश मोबाइलवर दाखविले. त्यानंतर आरोपीच्या सांगण्यावरून फिर्यादीने त्याला फोनपेच्या माध्यमातून एक लाख रुपये पाठवले. तसेच ५ जून आणि २० जून २०२४ रोजी कॅनॉट प्लेस परिसरातील महाराणा प्रताप उद्यान गेटसमोर दोन टप्प्यांत २० लाख रुपये रोख स्वरूपात दिले.
फसवणूक उघड होऊ नये म्हणून आरोपीने फिर्यादीला पुरवठा निरीक्षक पदाची परीक्षा देण्यास भाग पाडले. मात्र, परीक्षेचा निकाल लागल्यानंतर यादीत स्वतःचे नाव नसल्याचे संदीप यांच्या निदर्शनास आले. याबाबत विचारणा केल्यानंतर आरोपीने समाजकल्याण विभागातील कनिष्ठ लिपिक पदाचा बनावट नियुक्ती आदेश दाखवत वेळकाढूपणा केला. तसेच पैशांची मागणी केल्यास “तुला कुठेही गायब करून टाकीन,” अशी धमकीही दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संदीप यांनी सिडको पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक योगेश गायकवाड करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*