पतीच्या संशयी स्वभावाने आणि सततच्या मानसिक तसेच शारीरिक छळाने त्रस्त झालेल्या 26 वर्षीय डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शनिवारी (24 ऑगस्ट) दुपारी 1 वाजता ही घटना उघडकीस आली. प्रतीक्षा प्रकाश भुसारे असे मृत तरुणीचे नाव असून, ती मूळची कन्नड तालुक्यातील होती. प्रतीक्षा एमबीबीएस (MBBS) डॉक्टर होती आणि मार्च महिन्यातच तिचा विवाह प्रीतम गवारे (वय 27) याच्यासोबत झाला होता.
लग्नानंतर काही दिवसांतच पती प्रीतमने तिच्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. तिच्या चारित्र्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यासोबतच, वडिलांकडून पैसे आणण्याचा दबाव, तसेच घराच्या फर्निचरसाठी पैशांची मागणी करत असल्यामुळे प्रतीक्षा तणावाखाली गेली होती. महिनाभरापूर्वी तिला एमजीएम रुग्णालयात नोकरी मिळाली होती, आणि ती सध्या प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होती. परंतु, पतीच्या सततच्या त्रासामुळे ती अधिकाधिक तणावग्रस्त होत चालली होती.
शनिवारी, तणावाच्या कडेलोटावर पोहोचलेल्या प्रतीक्षाने घरात येऊन पतीला शेवटचा मेसेज केला आणि गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. राखीपौर्णिमेनिमित्त घरी परतलेल्या पतीला पत्नी गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. त्याने तात्काळ रुग्णवाहिका बोलावून तिला एमजीएम रुग्णालयात दाखल केले, मात्र तिचे प्राण वाचू शकले नाहीत. घटनास्थळी दाखल झालेल्या सिडको पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक योगेश गायकवाड आणि उपनिरीक्षक निशिगंधा म्हस्के यांनी परिस्थितीची पाहणी केली.
प्रतीक्षा अत्यंत हुशार होती, तर पती प्रीतम अद्याप मेडिकलचे शिक्षण घेत होता. कन्नड परिसरातच त्याची एक सुपर शॉपीदेखील होती. मात्र, त्याचा संशयी स्वभाव आणि फोन करून सतत विचारणा करणे, फोन न उचलल्यास 7 ते 10 वेळा फोन करून त्रास देणे, यामुळे प्रतीक्षा प्रचंड तणावात होती. तिच्या आत्महत्येपूर्वी, प्रीतमच्या त्रासामुळे तिने आपल्या वेदनांना तीन पानांमध्ये उतरवले होते. पोलिसांनी सदर चिठ्ठी जप्त केली असून, तिच्या कुटुंबियांनी प्रीतमवर संशय व्यक्त केला आहे.
सध्या सहायक निरीक्षक योगेश गायकवाड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, एका हुशार आणि प्रामाणिक डॉक्टरने जीवन संपवल्याने समाजातही संतापाची लाट उसळली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*