सलीम अली तलावात आढळलेला मृतदेह बीएएमएसच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनी अपूर्वा दिलीप गजहंस (वय २१) हिचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, प्रियकराकडून होणाऱ्या छळामुळे आणि जातीभेदाच्या तणावामुळे अपूर्वाने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात सिटीचौक पोलिसांनी तिच्या प्रियकर किरण कांबळे याला अटक केली आहे.
अपूर्वाच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले होते. ती आई, भाऊ, आणि दोन बहिणींसह पडेगाव परिसरात राहत होती. ती संगमनेरच्या अश्विन रुरल आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षण घेत होती. १७ ऑगस्ट रोजी राखी पोर्णिमेनिमित्त घरी आलेली अपूर्वा २० ऑगस्ट रोजी मैत्रिणीच्या भेटीचे कारण सांगून घरातून बाहेर पडली, मात्र तिचा पत्ता लागला नाही. दोन दिवसांनी सलीम अली तलावात तिचा मृतदेह आढळून आला.
प्राथमिक तपासानुसार, अपूर्वाने दोन महिन्यांपूर्वी तिच्या प्रियकर किरणसोबतच्या प्रेमसंबंधांबाबत घरी सांगितले होते. मात्र, जात वेगळी असल्याने किरणने विवाह करण्यास नकार दिला होता. तरीही किरण तिला वारंवार भेटायला बोलावत होता. अपूर्वाच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २० ऑगस्ट रोजी किरणने तिला भेटून तणावग्रस्त स्थितीत ठेवले आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केले.
पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करून किरण कांबळे याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*