छत्रपती संभाजीनगर : शहरातील शिवकृपा कॉलनी परिसरात एका महिलेने प्रसंगावधान राखत चोरट्याचा सामना केल्याची धाडसी घटना समोर आली आहे. घरात घुसून चोरी करणाऱ्या चोरट्याच्या मानेला थेट कोयता लावत त्याला घराबाहेर हाकलून लावल्याने या महिलेच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास हॉटेल निशांत पार्कच्या पाठीमागील शिवकृपा कॉलनीमध्ये घडली.

स्वाती सदानंद कुलकर्णी असे या धाडसी महिलेचे नाव असून त्या आपल्या वृद्ध आईसोबत राहतात. घटनेच्या रात्री त्यांचे पती बाहेरगावी गेले होते. पहाटेच्या सुमारास खालच्या मजल्यावरील लोखंडी गेटचा आवाज आल्याने स्वाती कुलकर्णी यांना जाग आली. त्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता, एक तरुण चोरटा कपाटातील साहित्याची उचकापाचक करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

आरडाओरडा केल्यास चोरटा स्वतःवर किंवा वृद्ध आईवर हल्ला करू शकतो, हे लक्षात घेऊन त्यांनी शांतपणे खाली येत झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी ठेवलेला धारदार कोयता हातात घेतला. त्यानंतर त्या पुन्हा वर गेल्या आणि चोरट्याला थेट आव्हान दिले. चोरटा अंगावर धावून येताच त्यांनी प्रसंगावधान राखत त्याच्या मानेला कोयता लावला. त्यानंतर मानेवर कोयता ठेवूनच त्याला पायऱ्यांवरून खाली उतरवत घराबाहेर हुसकावून लावले.

घराबाहेर पडल्यानंतर संतप्त झालेल्या चोरट्याने स्वाती कुलकर्णी यांच्या दिशेने वीट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी चपळाईने ती वीट चुकवली. अंधाराचा फायदा घेत चोरटा तेथून पसार झाला. मात्र, त्याने घरातील सुमारे दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, स्वाती कुलकर्णी यांनी दाखविलेल्या धाडसाबद्दल कॉलनीतील नागरिकांनी त्यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या धैर्याला सलाम केला.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,768 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क