छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी गोवंश जनावरांच्या बेकायदेशीर वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या नेण्यात येणाऱ्या २७ गोवंश जनावरांची सुटका केली. या कारवाईत ३१ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक, प्राण्यांवरील क्रूरता आणि बेकायदेशीर कत्तलीस प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत फुलंब्री पोलिसांनी २१ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चौका बसस्टँड परिसरात संशयास्पद टाटा कंटेनरची तपासणी केली.
तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये २७ बैल अत्यंत अमानुष पद्धतीने दाटीवाटीने कोंबून दोऱ्यांनी घट्ट बांधून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. जनावरांना हालचालीसाठीही जागा नसल्याने त्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला होता. तसेच वाहतुकीसाठी आवश्यक असलेली कोणतीही वैध परवानगी किंवा कागदपत्रे चालकाकडे उपलब्ध नव्हती.
या प्रकरणी इरफान शेख मेहमूद (वय ३७, रा. ईदगाह नगर, सिल्लोड) आणि असलम सुपडू कुरेशी (वय २२, रा. ईदगाह नगर, सिल्लोड) यांच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी १३ लाख ५० हजार रुपये किमतीची २७ गोवंश जनावरे आणि १८ लाख रुपये किमतीचा टाटा कंटेनर ट्रक असा एकूण ३१ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुटका करण्यात आलेल्या सर्व जनावरांना पाल येथील मातोश्री प्रयागबाई जाधव गौशाळेत सुरक्षितपणे दाखल करण्यात आले असून, त्यांची वैद्यकीय तपासणी व संगोपनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेश दवंगे तसेच नागलोत, शिंदे, घुसिंगे, गायकवाड, मसलकर, कांबळे, वक्ते आणि आरखडे आदी पोलिसांच्या पथकाने केली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*