छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासवर मंगळवारी सायंकाळी अवघ्या तीन तासांच्या अंतरात झालेल्या दोन भीषण अपघातांत एका महिलेसह शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुसाट वेगातील वाहनचालक आणि सर्व्हिस रोडवरील वाकलेला लोखंडी दुभाजक या दोन्ही घटनांमुळे बायपासवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पहिला अपघात सायंकाळी हॉटेल निशांत पार्कसमोर घडला. रमानगर येथील नीता रामजी गवळे (वय ४३) या मोपेडवरून गोदावरी टी-पॉईंटच्या दिशेने जात असताना मागून भरधाव आलेल्या रिक्षाने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे त्या दूर फेकल्या गेल्या. स्थानिकांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात, त्यानंतर घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या अपघातानंतर रिक्षातील प्रवाशांनी चालकाच्या बेफाम वाहनचालकाबाबत धक्कादायक माहिती दिली. चालक अशोक भाऊसाहेब ढाकणे हा रिक्षा अतिवेगाने चालवत इतर वाहनांना कट मारत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. अपघातानंतर रिक्षाही अनेक वेळा पलटी झाली. या घटनेत रिक्षातील काही प्रवासी व दोन लहान मुले जखमी झाली असून सातारा पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, रात्री बाळापूर शिवारातील गुरुप्रसादनगर परिसरात दुसरा अपघात घडला. गणेश राठोड (वय ४५, रा. वरझडी) हे दुचाकीवरून जात असताना सर्व्हिस रोडवरील वाकलेल्या लोखंडी दुभाजकाला त्यांची दुचाकी धडकली. या अपघातात त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अवघ्या तीन तासांत झालेल्या या दोन अपघातांमुळे बीड बायपासवरील बेफाम वेग, निष्काळजी वाहनचालक आणि धोकादायक अवस्थेतील दुभाजकांबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*