छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांना अधिक पौष्टिक आणि सकस आहार मिळावा यासाठी इस्कॉन अन्नामृत फाउंडेशनच्या वतीने शालेय पोषण आहारात गव्हाच्या पोळीचा समावेश करण्याचा प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. २७ जुलैपासून या उपक्रमाला सुरुवात झाली असून, आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांना पोळी दिली जात आहे. महाराष्ट्रात शालेय पोषण आहारात पोळीचा समावेश करण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगण्यात आले.

२०१२ मध्ये सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला अन्नामृत फाउंडेशनचा उपक्रम आज ४० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. सध्या शहरातील ५० मनपा, २० जिल्हा परिषद, १०० अनुदानित शाळा आणि ७८ बालवाड्यांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविला जातो. आहारात भाजीपाला, डाळी व कडधान्यांसोबत गव्हाचा समावेश असावा, या उद्देशाने पोळीचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे.

या उपक्रमासाठी संस्थेच्या दोन युनिटमध्ये स्वयंचलित यंत्रप्रणालीचा वापर केला जात आहे. पीठ मळणे, गोळे करणे आणि पोळ्या भाजणे ही प्रक्रिया यंत्राद्वारे केली जाते. संस्थेकडे असलेल्या तीन स्वयंचलित यंत्रांच्या मदतीने सुमारे सहा तासांत ६ ते ८ हजार पोळ्या तयार होतात. एका मशीनमधून तासाला सुमारे दोन हजार पोळ्या तयार करण्याची क्षमता आहे.

शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नारेगाव येथील अन्नामृत फाउंडेशनच्या स्वयंपाकघराला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. तसेच नारेगाव मनपा शाळेत विद्यार्थ्यांसोबत स्नेहभोजन केले. हा प्रयोग राज्यभर राबविण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

महिन्याला १ लाख ६० हजार पोळ्यांचे नियोजन असून, त्यासाठी वर्षाला सुमारे ६६ मेट्रिक टन गव्हाच्या पिठाची आवश्यकता आहे. शासनाने पीठ उपलब्ध करून दिल्यास हा उपक्रम पूर्ण क्षमतेने राबविणे शक्य होईल, असे अन्नामृत फाउंडेशनचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन पोटभरे यांनी सांगितले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

172 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क