पैठण : नाशिक आणि अहिल्यानगर परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊन धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे मराठवाड्यावरील संभाव्य जलसंकट टळले असून शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध वापर करणे आवश्यक असून कृषी सिंचन, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याची भविष्यात टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी जलसंपदा विभागाने आतापासूनच योग्य नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिल्या.
जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याच्या पार्श्वभूमीवर पैठण येथील नाथसागर जलाशयाचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले. यावेळी आमदार विलास भुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, जायकवाडी प्रकल्प हा संपूर्ण मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून शेती, उद्योग आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी गरज या प्रकल्पातून भागवली जाते. यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधानाची बाब आहे. मात्र, उपलब्ध पाण्याचा जबाबदारीने वापर केल्यास आगामी काळात सिंचनासह औद्योगिक आणि पिण्याच्या पाण्याची गरज प्रभावीपणे पूर्ण करता येईल.
आमदार विलास भुमरे यांनी नाथसागरात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे सांगितले. हा पाणीसाठा मराठवाड्याच्या शेती, उद्योग, पिण्याचे पाणी आणि सर्वांगीण विकासासाठी आशादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
जलपूजनावेळी गोदावरी नदीची साडी-चोळीने ओटी भरून श्रीफळ अर्पण करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., महापौर समीर राजूरकर यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
जायकवाडी पूर्ण भरल्याने मराठवाड्यातील कृषी सिंचन, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*