छत्रपती संभाजीनगर : रस्ते अपघात आणि त्यातून होणारे मृत्यू टाळण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांसोबतच शासकीय कर्मचाऱ्यांनीही वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, या उद्देशाने शहर पोलिसांनी मंगळवारी विशेष मोहीम राबवली. या कारवाईत विनाहेल्मेट दुचाकीवरून शासकीय कार्यालयात आलेल्या तब्बल ३०३ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण ३ लाख ३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, १२ हजार रुपयांचा दंड जागीच वसूल करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा परिषद, जीएसटी भवन, आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वन विभाग, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, न्यायवैद्यक प्रयोगशाळा तसेच अन्य महत्त्वाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर वाहतूक पोलिसांनी सकाळपासूनच तपासणी सुरू केली.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार आणि उपायुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी पोलिस विभागातील अधिकारी व अंमलदारांना दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार सोमवारीच विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या २६ पोलिस अधिकारी व अंमलदारांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर शहर पोलिसांनी इतर शासकीय कार्यालयांकडे मोर्चा वळवला.
शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांना यापूर्वीच पत्राद्वारे कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरण्याबाबत सूचना करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी प्रत्यक्ष तपासणीदरम्यान अनेक कर्मचारी विनाहेल्मेट आढळून आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.
सहाय्यक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेखा लोंढे, मंगेश जगताप, पवन चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन मिरधे आणि रवी गच्चे यांच्या पथकाने ही मोहीम राबवली. शासकीय यंत्रणेतील कर्मचारीच वाहतूक नियमांचे पालन करत असल्यास त्याचा सकारात्मक संदेश नागरिकांमध्ये जाईल, असा पोलिसांचा उद्देश आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*