छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ ऑगस्टनिमित्त काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसाठी मोठी तयारी करण्यात आली होती. या यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, शहरातील विविध भागांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठमोठे बॅनर झळकल्याने त्यावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
दीपके यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत तिरंगा रॅलीचे स्वागत करतानाच बॅनरबाजीवर प्रश्न उपस्थित केला. शहरात सर्वत्र एवढे मोठे बॅनर लावण्याची गरज आहे का, असा सवाल त्यांनी केला. या बॅनरवर होणारा खर्च ग्रामीण भागातील शाळांच्या सुधारणेसाठी वापरता आला असता, असेही त्यांनी म्हटले.
ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी चांगल्या रस्त्यांची मागणी करत असताना छत्रपती संभाजीनगर शहर मुख्यमंत्र्यांच्या बॅनरने व्यापले असल्याची टीकाही दीपके यांनी केली.
दरम्यान, पेपरफुटीच्या मुद्द्यानंतर CJPने आता सरकारी शाळांकडे मोर्चा वळवण्याची घोषणा केली आहे. सरकारी शाळांची दुरवस्था आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधांकडे होणाऱ्या दुर्लक्षाविरोधात देशव्यापी अभियान राबवण्याचे CJPने जाहीर केले आहे. या अभियानातून शिक्षणाच्या मूलभूत सुविधांचा मुद्दा देशपातळीवर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*