छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचा विकास करताना सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू असून, समाजातील सर्व घटकांनी विकास प्रक्रियेत सहभागी होऊन एकत्रितपणे देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले.

देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व राज्यगीतानंतर त्यांनी स्वातंत्र्यसैनिक व हुतात्म्यांना अभिवादन केले.

यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले की, विविधतेने नटलेल्या भारताला एकसंघ ठेवण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचे मोठे योगदान आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी मागील पिढ्यांनी केलेल्या त्यागाचे स्मरण प्रत्येकाने ठेवावे. शासनाच्या विकास प्रक्रियेत समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत असून, घाटी रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर, खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आणि अत्याधुनिक अग्निशामक दल यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांनी जलसंधारण सप्ताहाची शपथ दिली तसेच सप्ताहाच्या लोगोचे अनावरण केले. विविध पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले.

स्वच्छता वाहनांचे लोकार्पण

पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते सात जेटींग स्वच्छता वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. ही वाहने छत्रपती संभाजीनगर महापालिकेसह कन्नड, पैठण, सोयगाव, वैजापूर, फुलंब्री आणि गंगापूर नगरपालिकांना वितरित करण्यात आली.

सोहळ्यास लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

486 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क