छत्रपती संभाजीनगर : मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कामाने वेग घेतला असून, वाढीव मुदतीनंतर हे काम जवळपास पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ३२ लाख १६ हजार १६७ मतदारांपैकी अर्ज वितरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. तर भरून घेतलेल्या अर्जांच्या डिजिटायझेशनचे काम ८०.९४ टक्क्यांवर पोहोचले आहे.
दरम्यान, तब्बल ६ लाख १२ हजार ३९२ मतदार दिलेल्या पत्त्यावर आढळून आलेले नाहीत. हे मतदार स्थलांतरित किंवा मृत झाले असण्याची शक्यता असून, त्यांचे अर्ज ‘संकलित न होणाऱ्या’ श्रेणीत टाकण्यात आले आहेत. त्यामुळे सुमारे ६ लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी सविता चौधर यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यातील डिजिटायझेशनच्या कामात कन्नड विधानसभा मतदारसंघ आघाडीवर आहे. येथे ९०.८९ टक्के काम पूर्ण झाले असून, वैजापूरमध्ये ९०.८५, पैठणमध्ये ८८.४५, सिल्लोडमध्ये ८७.०३, गंगापूरमध्ये ८४.३२ आणि फुलंब्रीमध्ये ८२.२३ टक्के काम झाले आहे. तर औरंगाबाद पश्चिममध्ये ७२.९७, मध्य मतदारसंघात ६८.२२ आणि पूर्व मतदारसंघात ६६.९३ टक्के डिजिटायझेशन झाले आहे.
SIR चा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता २४ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. २०२४ च्या विधानसभा मतदार यादीतील मात्र २००२ च्या यादीशी जुळणी न झालेल्या सुमारे ४ ते ५ लाख मतदारांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
या मतदारांना २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबरदरम्यान दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात तब्बल २११ सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*