छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी परदेशी नागरिकांच्या वास्तव्याबाबत नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस, पेइंग गेस्ट किंवा होमस्टे अशा ठिकाणी परदेशी नागरिक मुक्कामी आल्यास त्याची माहिती पोलिस प्रशासनाकडे ऑनलाइन नोंदवणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. माहिती दडविल्यास संबंधित निवास व्यवस्थापकावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
इमिग्रेशन अँड फॉरेन्स अॅक्ट अँड रूल्स २०२५ मधील तरतुदींनुसार, परदेशी नागरिकाच्या आगमनापासून २४ तासांच्या आत त्याची आवश्यक माहिती विहित ‘Form III/C Form’ किंवा अधिकृत डिजिटल माध्यमातून ऑनलाइन सादर करावी लागणार आहे. केवळ आगमनाची नोंद नव्हे, तर संबंधित नागरिकाच्या निर्गमनाची माहिती तसेच त्यानंतर तो कुठे वास्तव्य करणार आहे, याची माहितीही निर्धारित वेळेत पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक आहे.
नियमांचे उल्लंघन करून माहिती लपविणे, चुकीची अथवा अपूर्ण माहिती देणे याची पोलिसांकडून गंभीर दखल घेतली जाणार आहे. अशा प्रकरणांत संबंधित चालक किंवा व्यवस्थापकाविरुद्ध थेट गुन्हा दाखल होऊ शकतो.
याशिवाय परदेशी नागरिकांच्या वास्तव्याशी संबंधित डिजिटल नोंदी सुरक्षित ठेवणे आणि प्रशासनाने मागणी केल्यास त्या तपासणीसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व संबंधित आस्थापनांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*