छत्रपती संभाजीनगर : बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापनाच्या अरेरावी आणि कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे असलेल्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने देशभर एक दिवसाचा निषेध संप पुकारण्यात आला. गुरुवारी (दि. २०) छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात बँकेच्या शाखेसमोर संघटनेच्या सभासदांनी निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनाबाबत माहिती देताना कॉम्रेड श्रुतिका मोहड यांनी सांगितले की, या संपाचा मुख्य उद्देश नोकर भरतीला चालना देणे, न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करणे आणि कायदेशीर तरतुदींचे पालन करणे हा आहे. मात्र, व्यवस्थापनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आंदोलनाची वेळ आली आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष कॉम्रेड राजेंद्र देवळे यांनी सांगितले की, २०१२-१३ मध्ये बँकेचा व्यवसाय १.७१ लाख कोटी होता, तेव्हा ६५९० लिपिक आणि २८४० शिपाई होते. मात्र, २०२५ मध्ये बँकेचा व्यवसाय तब्बल ५ लाख कोटींवर पोहोचला असला तरी लिपिकांची संख्या ३५०० आणि शिपाई फक्त १८४० इतकीच राहिली आहे.
त्यामुळे अनेक शाखांमध्ये कर्मचाऱ्यांची टंचाई असून, ३०१ शाखांमध्ये एकही लिपिक नाही, तर ७०० शाखांमध्ये शिपाईच नाहीत. त्यामुळे ग्राहकसेवा आणि कामकाजावर परिणाम होत आहे. या संपाद्वारे व्यवस्थापनाला कर्मचारी भरती करण्यासाठी भाग पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात कॉम्रेड पियुष बिऱ्हाडे, कॉ. सदानंद बिडकर, कॉ. अनुज चौधरी, कॉ. रमेश खैरनार, कॉ. शीला खरात, कॉ. नेहा भीरंगे, कॉ. ज्योती कुलकर्णी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाकडे आता व्यवस्थापन कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*