गजानन राऊत / प्रतिनिधी वाळूज : बजाजनगर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत एका व्यसनी पतीने पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पत्नीने दारू पिण्यास विरोध केल्याने संतप्त झालेल्या पतीने धारदार कैचीनं तिच्या मानेवर सपासप वार केले. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
आरोपी पतीचे नाव ऋषिकेश भिकाजी खैरे असे आहे. हल्ल्यानंतर आरोपी पती फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
वादातून जीवघेणा हल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश खैरे हा मूळचा जालना जिल्ह्यातील सोमनाथ जळगाव येथील आहे. २०१७ मध्ये त्याचा कावेरी (नाव बदललेले आहे) विवाह झाला. त्यांना पाच वर्षांची एक चिमुकली मुलगी आहे. दोघे बजाजनगर येथील गणपती मंदिराजवळ भाड्याने राहत असून, “गौरी किराणा” नावाने दुकान चालवत होते.
गेल्या काही दिवसांपासून ऋषिकेश दारूच्या व्यसनात अडकला होता. त्यामुळे त्यांच्या दुकान व्यवसायावरही विपरीत परिणाम होत होता. कावेरीने पतीच्या दारू पिण्यावर वारंवार आक्षेप घेतला होता. त्यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते.
आज दुपारी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. संतापाच्या भरात ऋषिकेशने जवळ असलेल्या धारदार कैचीनं कावेरीच्या मानेवर आणि गळ्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात कावेरी गंभीर जखमी झाली आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.
शेजाऱ्यांची तत्परता, पोलिसांचा तपास सुरू
घटनेदरम्यान कावेरीचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले. त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, कावेरीच्या मानेवर ६० ते ७० टाके पडले आहेत. तिची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, हल्ल्यानंतर ऋषिकेश घटनास्थळावरून फरार झाला. कावेरीच्या भावाने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अरविंद शिंदे तपास करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*