छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणी त्यांनी स्वतःच्या पत्नी सारिका आणि तिच्या मित्राविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात सहा जणांचा सहभाग असल्याचे समोर आले असून, पोलिसांनी त्यांच्यावर अॅट्रॉसिटी, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

देवेंद्र कटके आणि सारिका यांचा २००० मध्ये आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरू होते. कटके यांनी काही दिवसांपूर्वीच आपली संपत्ती मुलांच्या नावे केल्याची चर्चा महसूल विभागात आहे. सारिका माहेरी गेल्यानंतर तिचा मोबाइल घरी विसरला आणि त्यातून कटके यांना संशयास्पद रेकॉर्डिंग व स्क्रीनशॉट मिळाले. यामध्ये काही रहस्यमय गोष्टी समोर आल्या. त्यानंतर त्यांनी तपास सुरू केला असता, जीपीएस लोकेशननुसार सारिका वडीगोद्री येथे एका हॉटेलजवळ तिघांसोबत बराच वेळ थांबली होती. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान ती तिथे तीन अनोळखी व्यक्तींना भेटत असल्याचे कटके यांनी पाहिले.

सारिकाचा मित्र विनोद उबाळे अघोरी विद्येचा उपासक असल्याचे मोबाइलमधील रेकॉर्डिंगवरून स्पष्ट झाले होते. हे लक्षात आल्यानंतर कटके यांनी घराची तपासणी केली. त्यात काही संशयास्पद वस्तू आणि पुरावे मिळाले. पोलिसांनी तपास सुरू करताच आणखी काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

२०१५ मध्ये लक्ष्मीपूजनाच्या रात्री सारिका उशिरापर्यंत मोबाइलवर चॅट करत होती. ती झोपल्यानंतर कटके यांनी तिचा मोबाइल पाहिला असता, त्यात काही संशयास्पद गोष्टी आढळल्या. कटके यांनी हा प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितला. त्यांनी तिची चूक कबूल करून माफी मागितली होती. त्यानंतर मुलांच्या भविष्यासाठी कटके शांत राहिले.

२०१३ मध्ये सारिकाने देवेंद्र कटके यांच्याशी जातिवाचक टिप्पणी करत अपमान केला होता. “मला आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केले. नाहीतर तुझ्यासारख्या खालच्या जातीच्या व्यक्तीशी लग्न केले नसते,” असे तिने सांगितले होते. तिचे वागणे दिवसेंदिवस तिरस्कारी होत गेले.

पोलिस तपास सुरू

या प्रकरणातील सर्व पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून, आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय वर्तुळात हा प्रकार मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,624 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क