पैठण येथे मुलगा दारू पिऊन त्रास देत असल्याने आईनेच २० हजार रुपयांची सुपारी देऊन त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पैठण पोलिसांनी आईसह तिघांना अटक केली आहे.
१६ मार्च रोजी संत ज्ञानेश्वर उद्यानातील नाल्यात ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी शवविच्छेदन अहवालातून मृताच्या गळ्यावर आवळल्याचे निशाण आढळल्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली. प्राथमिक तपासात मृताची आईच तक्रारदार होती, मात्र पोलिस तपास जसजसा पुढे सरकला तसतसा धक्कादायक खुलासा झाला. तपासादरम्यान पोलिसांना समजले की, मुलाला दारूचे व्यसन होते आणि पत्नीही त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. त्यामुळे तो रोज दारू पिऊन आईला त्रास देत असे तसेच चुकीच्या गोष्टींची मागणी करत असे. या सततच्या छळामुळे त्रस्त झालेल्या आईने शेजारी राहणाऱ्या एका महिलेला ही व्यथा सांगितली. त्यावर संबंधित महिलेकडून “अशा मुलाला कायमचा संपवा” असा सल्ला मिळाला.
आईने हा सल्ला गांभीर्याने घेत किरण गायकवाड नामक व्यक्तीला २० हजार रुपयांची सुपारी दिली. त्यातील १८ हजार रुपये त्वरित दिले, तर उरलेले दोन हजार नंतर देण्याचे ठरले. किरण गायकवाड याने विजय जाधव याला या कटात सहभागी करून घेतले. दोघांनी त्या तरुणाला दारू पिण्याच्या बहाण्याने संत ज्ञानेश्वर उद्यानात नेले आणि दोरीने गळा आवळून खून केला. ओळख पटू नये म्हणून मृताच्या तोंडाला चिखल लावून त्याचा मृतदेह नाल्यात फेकला.
पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत आईसह सुपारी देणारा किरण गायकवाड आणि विजय जाधव यांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण पैठण शहरात खळबळ माजली असून आईनेच आपल्या मुलाचा जीव घेतल्याने समाजमन सुन्न झाले आहे.
पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी करण्यात येत आहे. दारूच्या व्यसनामुळे घरांमध्ये निर्माण होणाऱ्या या प्रकारच्या भीषण घटनांनी समाजाने जागरूक होण्याची आवश्यकता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*