छत्रपती संभाजीनगर : सायबर गुन्हेगारांनी शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका कन्सल्टिंग व्यावसायिकाला तब्बल ४२ लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणी झीरो एफआयआर दाखल करून अधिक तपासासाठी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याकडे वर्ग केले आहे.
राजेश नायर (रा. एन-१) यांना ५ फेब्रुवारी रोजी अनोळखी क्रमांकावरून फोन आला. कॉलवरील महिलने स्वतःला निशा बासू म्हणून ओळख देत, ‘शेरखान सिक्युरिटी प्रा.लि.’ या कंपनीत गुंतवणुकीसाठी आमिष दाखवले. व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी झाल्यास अधिक परतावा मिळेल, असे सांगितले. विविध शेअर्सविषयी माहिती देत गुंतवणुकीसाठी बँक खात्याचा तपशील दिला. त्यांचे पैसे आयपीओमध्ये गुंतवले जातील आणि मोठा नफा मिळेल, असे आश्वासन देण्यात आले.
सायबर गुन्हेगारांनी ३० दिवस सतत नायर यांच्याशी संपर्क ठेवला, त्यामुळे त्यांनी विश्वास ठेवून दिलेल्या खात्यावर ४२.१८ लाख रुपये जमा केले. ‘मीराई असेट शेरखान’ या पोर्टलवर त्यांच्या गुंतवणुकीला नफा दिसत होता. मात्र, ६ मार्च रोजी त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता बासूने १९ लाखांचा कर भरण्याची अट घातली. यामुळे नायर यांना संशय आला आणि त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
सुरुवातीच्या तपासात सायबर गुन्हेगारांनी बनावट कंपन्यांच्या आणि स्टार्टअपच्या नावाने बँक खाती उघडल्याचे उघड झाले आहे. तब्बल १७ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ही रक्कम वळवण्यात आली. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहून अनोळखी गुंतवणूक योजनांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*