गजानन राऊत/ प्रतिनिधी वाळूज : एका 34 वर्षीय विवाहितेवर तिच्या पतीने आणि त्याच्या 50 वर्षीय मित्राने वेळोवेळी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे, तर पतीच्या मित्राने पीडितेच्या 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. हा प्रकार शुक्रवारी (ता. 28) उघडकीस आला.
पीडित महिलेचे 2007 मध्ये सोमीनाथ वनारसे (रा. नांदखेडा, ता. भोकरदन) याच्यासोबत लग्न झाले होते. सुरुवातीला दोघे रांजणगाव (शेणपुंजी) येथे राहत होते. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. 2017 मध्ये सोमीनाथ व्यवसायानिमित्त दक्षिण आफ्रिकेला गेला, त्यामुळे पीडिता मुलांसह भारतातच राहिली.
2020 मध्ये मुलांच्या शिक्षणासाठी सोमीनाथने बजाजनगर येथे घर भाड्याने घेतले. त्यावेळी त्याने वाहीद पठाण (वय 50, रा. पंढरपूर) याची ओळख पीडितेशी करून दिली आणि तो आपला चांगला मित्र असल्याचे सांगितले. काही दिवसांनंतर, 2021 मध्ये सोमीनाथ आणि वाहीद पठाण हे दोघे रात्री 9 वाजता पीडितेच्या घरी आले. त्या वेळी मुले झोपलेली होती. दोघांनी शिवीगाळ करत जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. तसेच, जर कुणाला काही सांगितले तर मुलांना ठार मारण्याची धमकी दिली.
यामुळे घाबरलेल्या पीडितेने काही दिवसांनी दुसऱ्या ठिकाणी घर बदलले. मात्र, 2023 मध्ये पुन्हा एकदा पती आणि त्याच्या मित्राने रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत तिच्यावर अत्याचार केला. 2024 मध्ये वाहीद पठाण पतीच्या सांगण्यावरून तिच्या घरी गेला आणि 17 वर्षीय मुलीला जबरदस्तीने ओढून बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेने प्रसंगावधान राखत त्याला घराबाहेर हाकलून दिले.
या घटनेनंतर पीडितेने माहेरी आश्रय घेतला. मात्र, पती सतत तिच्या मागे लागला आणि औरंगाबादला येण्यासाठी जबरदस्ती करू लागला. नकार दिल्यावर त्याने मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर तिने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन पती आणि त्याच्या मित्राविरोधात बलात्काराची फिर्याद दिली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी पती सोमीनाथ वनारसे आणि वाहीद पठाण यांना अटक केली. पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे करत आहेत.
ही घटना समाजातील महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाला वाचा फोडणारी असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*