छत्रपती संभाजीनगर : वळदगाव (ता. गंगापूर) येथे ग्रामपंचायत आणि महिला व बालकल्याण समितीच्या तातडीच्या कारवाईमुळे एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह रोखण्यात यश आले आहे. १ मे २०२५ रोजी मेहकर (जि. बुलडाणा) येथील तरुणाशी हा विवाह होणार होता. मात्र, चाइल्ड हेल्पलाइनवर मिळालेल्या तक्रारीच्या आधारे त्वरीत कारवाई करत हा बालविवाह थांबविण्यात आला.
महिला व बालकल्याण विभागाच्या संरक्षण अधिकारी कल्पना मोहिते यांनी बालविवाहाची माहिती मिळताच वळदगाव ग्रामपंचायतीचे अधिकारी प्रल्हाद रिंढे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पाटील प्रकाश म्हस्के, अंगणवाडी सेविका राधा वाकळे, मनीषा झळके, लिपिक रितेश पहाडिये यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी विवाहासाठी घरात पाहुण्यांची उपस्थिती होती.
समितीच्या वतीने अल्पवयीन मुलगी, तिचे पालक व नातेवाईक यांच्याशी समुपदेशन करण्यात आले. कल्पना मोहिते यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातूनही समुपदेशन केले. समजावणीअंती पालकांनी मुलगी अठरा वर्षांची होईपर्यंत विवाह न करण्याचा लेखी वचननामा दिला. तसेच बालविवाह केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, याची माहिती सर्व संबंधितांना देण्यात आली.
या कारवाईत ग्रामपंचायत शिपाई राजू मुसळे व जालिंदर खोतकर यांनी महत्त्वाचे सहकार्य केले. ग्रामस्थांनीही या पावलाचे स्वागत करत महिला व बालकल्याण विभागाचे कौतुक केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*