छत्रपती संभाजीनगर: शहरातील कोकणवाडी परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून थेट रिक्षामध्ये गॅस रिफिलिंग करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत ३२ गॅस सिलिंडरसह २ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई २५ जून रोजी कोकणवाडी चौकात करण्यात आली. आरोपीचे नाव अशरफ खान उमरखान (३६, रा. काली मस्जिदजवळ, कोकणवाडी) असे असून, तो घरगुती सिलिंडरमधून विद्युत पंपाच्या साहाय्याने रिक्षामध्ये गॅस भरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण वाघ, अंमलदार विजय निकम, मनोहर गिते, कृष्णा गायके आणि विजय घुगे यांच्या पथकाने कारवाई केली.
छाप्यात १८ भरलेले आणि १४ रिकामे असे एकूण ३२ गॅस सिलिंडर, २ वजन काटे, २ विद्युत पंप, आणि एक रिक्षा असा २ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता जिल्हा पुरवठा विभागाचे अन्नधान्य वितरण अधिकारी बी. बी. वाकोडे, पुरवठा निरीक्षक अशोक दराडे आणि डी. एस. पांचाळ यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तपासणीनंतर त्यांनीही कारवाईला दुजोरा दिला.
या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे. अवैध गॅस व्यवसायामुळे होणाऱ्या संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेता ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KOOzOvmJm8UAlKfzgNGy49
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*