छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर येथील संतोष लड्डा यांच्या बंगल्यात झालेल्या मोठ्या दरोड्याप्रकरणात गुन्हे शाखेने आणखी एक धक्कादायक अटक केली आहे. या प्रकरणातील मास्टरमाइंड दरोडेखोर अमोल खोतकरच्या बहिणीला – रोहिणी बाबूराव खोतकर (३५, रा. आर्च आंगण, पडेगाव) – पोलिसांनी अटक केली असून तिच्याकडून २२० ग्रॅमचे सोन्याचे दागिने आणि ७ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी ही माहिती दिली आहे. 

रोहिणीच्या घराची झडती घेत असताना घरासमोरील तुळशी वृंदावनात मातीखाली लपवलेले दागिने आणि काडतुसे पोलिसांना सापडली. याच दरोड्याप्रकरणात यापूर्वी अमोल खोतकरचे एन्काउंटर करण्यात आले होते. तोच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार होता.

१४ मे रोजी संतोष लड्डा यांच्या बंगल्यात सहा दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकावर साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लुटला होता. याप्रकरणात आतापर्यंत २१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून एकूण ७९४ ग्रॅम सोने, ३२ किलो चांदी, आठ लाख रुपये रोख आणि चारचाकी-दुचाकी वाहन जप्त करण्यात आली आहेत.

रोहिणीला चौकशीसाठी बोलावले असता ती १८ जूनला मोबाईल बंद करून गोव्याला पळून गेली होती. तिचा मित्र रणजित याच्याकडे तिने काही दागिने सुपूर्त केल्याचा पोलिसांना संशय आहे. तिच्या कॉल डिटेल्समध्ये तीन संशयित व्यक्ती आढळून आल्या असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

मंगळवारी रोहिणीला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी तिने मानसिक तणाव आणि वडिलांच्या वृद्धपकाळाचे कारण देत, “रात्री घरी जाऊ द्या नाहीतर आम्हाला विष घ्यावं लागेल,” असे सांगून न्यायालयाला भावनिक साद घातली. मात्र सरकारी वकील सुधीर बनसोडे यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने तिला २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

या कारवाईत पोलिस निरीक्षक संभाजी पवार, एपीआय विनायक शेळके, जयश्री कुलकर्णी, काशिनाथ महांडुळे यांच्यासह महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. दरोड्यातील उर्वरित मुद्देमाल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तपास सुरूच आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KOOzOvmJm8UAlKfzgNGy49

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,670 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क