छत्रपती संभाजीनगर : मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांना सवलतीसह कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी महापालिकेने ‘शास्ती से आझादी’ आणि ‘शास्ती से मुक्ती’ या दोन विशेष योजना जाहीर केल्या आहेत. या योजनेअंतर्गत मालमत्ताधारकांना ९५ टक्के शास्ती माफ करण्यात येणार असून, विविध ठिकाणी कर वसुली शिबिरे घेण्यात येणार आहेत. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी रविवारी (दि. १३) आयोजित आढावा बैठकीत यासंदर्भातील आदेश दिले.
स्मार्ट सिटी कार्यालयात झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त विकास नवाळे, सर्व झोनचे सहायक आयुक्त आणि अधिकारी उपस्थित होते. जी. श्रीकांत यांनी सांगितले की, शासकीय कार्यालये, मंगल कार्यालये, पेट्रोलपंप, आरोग्य केंद्र, रेशन दुकान, नागरी मदत केंद्र आदी ठिकाणी शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस कर वसुली शिबिरे आयोजित करावीत.
तसेच अधिकृत स्लम परिसरातील मिक्स मालमत्तांवरील शास्ती पूर्णपणे माफ करून त्यांना रहिवासी मालमत्ता म्हणून वर्गीकृत करून कर वसूल करावा. महापालिकेचा कोणताही कर थकीत असलेल्या मालमत्ताधारकांना इतर योजनांचा लाभ दिला जाणार नाही.
महत्त्वाचे म्हणजे, शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या रहिवासी प्रमाणपत्रासाठी आता मालमत्ता कर व पाणीपट्टी बेबाक असणे बंधनकारक केले जाणार आहे. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.
मनपा झोन कार्यालये दररोज रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचेही आदेश देण्यात आले असून, शनिवार-रविवारसुद्धा वसुलीसाठी कार्यालये सुरू राहणार आहेत. रविवारची सुटी सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात येईल.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HxCi3XB18w2Dvq8ojRc05z?mode=ac_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*