छत्रपती संभाजीनगर : शहर व परिसरात सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी (२१ जुलै) सायंकाळपासून शहरात पावसाची सुरुवात झाली असून मंगळवारी (२२ जुलै) दिवसभर रिमझिम ते हलक्या सरींचा खेळ सुरू राहिला. चिकलठाणा येथील हवामान वेधशाळेत मंगळवारी रात्री साडेआठपर्यंत एकूण १३.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी १५ जुलै रोजी शहरात २१.५ मिमी पाऊस पडला होता.
सोमवारी रात्रीपासून सतत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या. मंगळवारी सकाळी दहापर्यंत रिमझिम पावसाचे वातावरण कायम होते. दुपारनंतर काही वेळा सूर्यदर्शन झाले तरी आभाळ ढगाळच राहिले. सायंकाळी सहानंतर ढगांची गर्दी वाढली आणि पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत १.३ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर सायंकाळपर्यंत १२.१ मिमी पाऊस पडून एकूण १३.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, शहरात बुधवारी (२३ जुलै)ही ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे. गुरुवार आणि शुक्रवार (२४ व २५ जुलै) दरम्यानही पावसाची हजेरी राहील. तथापि, भारतीय हवामानशास्त्र विभागाने या दिवसांसाठी कोणताही अलर्ट जारी केलेला नाही. मात्र, २६ जुलै रोजी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सतत कोरड्या हवामानामुळे उष्णतेचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना पावसाने दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे. पेरणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत असल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे. मात्र, जोरदार पावसाच्या सरींमुळे रस्त्यांवरील वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रशासन सतर्क राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FVG9etwDw0n6MyMqWmu8uz?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*