छत्रपती संभाजीनगर :  शहरातील अतिक्रमणविरोधी कारवाईनंतर आता वेरूळ लेणी आणि श्री घृष्णेश्वर मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. मंगळवार (२२ जुलै) आणि बुधवार (२३ जुलै) रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एस. के. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यांचे मोजमाप व मार्किंगचे काम पूर्ण करण्यात आले. हे मार्किंग १५ मीटर (सुमारे ५० फूट) अंतरावर करण्यात आले आहे.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या परिसरातील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, काही टपरीधारक आणि छोटे व्यापारी स्वखुशीने आपले अतिक्रमण हटवू लागले आहेत. तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी सांगितले की, मार्किंग पूर्ण झाल्यानंतर पुढील दोन ते चार दिवसांत अतिक्रमणावर कारवाई होईल आणि त्यासाठी आवश्यक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येईल.

वेरूळ लेणी परिसर हा धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. अतिक्रमणामुळे पर्यटक व भाविकांना होणारा त्रास टाळण्यासाठी ही मोहीम गरजेची असल्याचे पर्यटक आणि नागरिकांनी मत व्यक्त केले आहे. जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिलेल्या पत्रानुसार, कुंभमेळ्यापूर्वी सर्व रस्ते मोकळे करण्यात येतील.

खुलताबाद तालुक्यातील शूलिभंजनपर्यंत लेखी नोटिसा देण्यात आल्या असून, वेरूळ शिवारात तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधितांनी तीन दिवसांत आपले अतिक्रमण काढून न घेतल्यास प्रशासनाकडून कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी स्वखुशीने अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे.

या मोहिमेनंतर गायरान आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमणावरही कारवाई करून परिसर पूर्णपणे मोकळा करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. धार्मिक आणि पर्यटन स्थळाचा दर्जा टिकवण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FVG9etwDw0n6MyMqWmu8uz?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,192 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क