छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची रस्ता रुंदीकरण मोहीम तब्बल २४ दिवसांच्या खंडानंतर सोमवारी (४ ऑगस्ट) पुन्हा सुरू झाली. नारेगावच्या जय भवानी चौक ते नाला या दरम्यान ३० मीटर रुंद रस्त्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईत एकूण १७५ पक्की आणि कच्ची बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. यात हॉटेल, दुकाने, गॅरेज, कंपाऊंड, शेड, फलक, साईन बोर्ड आदींचा समावेश होता.

आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता प्रत्यक्ष मोजणी व मार्किंगचे काम सुरू झाले. मात्र, नगररचना विभागाच्या टोटल स्टेशन सर्व्हेत झालेल्या त्रुटींवर स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतल्याने पथकाला तब्बल पाच तास खोळंबा सहन करावा लागला. अखेरीस दुपारी साडेबाराला कारवाईला सुरूवात झाली.

या मोहिमेत महानगरपालिकेचे ३५० अधिकारी-कर्मचारी, तर पोलिस विभागाचे २०० अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले. कारवाईसाठी १५ जेसीबी, ४ पोकलॅन, १५ टिप्पर, २ रुग्णवाहिका, २ कोंडवाडा वाहने, २ अग्निशमन बंब, ५ इलेक्ट्रिक हायड्रॉलिक वाहने आदी यंत्रणा वापरण्यात आल्या.

पोलिसांच्या क्यूआरटी, दंगाकाबू पथक व नागरी मित्र पथकाने कारवाईदरम्यान शक्तीप्रदर्शनासाठी लॉग मार्च काढला. बहुतांश ठिकाणी नागरिकांचा विरोध झाला, मात्र नागरी मित्र पथकाने समजावून तो निवळवला. एका नशेखोराने गोंधळ घालण्याचाही प्रयत्न केला. कारवाईत अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अतिक्रमण विभागाने दिली.

या कारवाईत कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) अमोल कुलकर्णी, पोलीस उपआयुक्त प्रशांत स्वामी, सुदर्शन पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

आज भवानी चौक ते कचरा डेपोपर्यंत कारवाई

संतोष वाहुळे यांनी सांगितले की, आज मंगळवारी (५ ऑगस्ट) भवानी चौक ते कचरा डेपो पर्यंत ३० मीटर रुंद रस्त्यासाठी उर्वरित बाधित मालमत्तांवरील कारवाई करण्यात येणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,825 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क