नाशिक : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस निवडणूक प्रक्रियेची सुरुवात होणार आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
सुप्रीम कोर्टाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले असून, मनपा, जिल्हा परिषद, नगरपालिका अशा सर्व निवडणुका टप्प्याटप्याने घेण्यात येणार आहेत. नाशिकमध्ये सुमारे ५० लाख ४५ हजार मतदार असून, ४९८२ मतदान केंद्रे आहेत. सर्व निवडणुका एकत्र घेतल्यास मनुष्यबळाची कमतरता भासेल, त्यामुळे टप्प्याटप्याने मतदान प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात येईल. पहिल्या टप्प्यात कोणत्या संस्थांच्या निवडणुका होतील, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
आगामी निवडणुकीत ओबीसी आरक्षणासाठी मागीलप्रमाणेच लॉटरी पद्धत वापरली जाईल. प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर मतदार याद्या विभाजित केल्या जातील. १ जुलैपर्यंत मतदार यादीत असलेले नावच अंतिम यादीत समाविष्ट केले जाईल. मतदार यादीत नावे वाढविणे किंवा कमी करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे नसल्याचेही वाघमारे यांनी स्पष्ट केले.
सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात वॉर्ड आणि प्रभाग रचनेचा पूर्ण अधिकार राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोगाकडे असल्याचे सांगितले आहे. न्यायालय या प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट करत, औसा नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भातील आणि ओबीसी आरक्षणाविरोधातील याचिका फेटाळल्या. त्यामुळे राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका लवकरच पार पडणार असून, दिवाळीनंतर राजकीय वातावरण रंगतदार होण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*