छत्रपती संभाजीनगर : सुखी संसाराचे स्वप्न उराशी बाळगून एका बेरोजगार तरुणाने एजंटामार्फत १ लाख ८० हजार रुपये खर्च करून केलेले लग्न केवळ दोन तासांतच फसवणुकीत परिवर्तित झाले. लग्नाचे सोपस्कार पार पडून गावाकडे जात असताना रस्त्यात गाडी अडवून नववधू दिशा कदम ही कागदपत्रे व ३५ हजारांची रोख रक्कम घेऊन पसार झाली. ही धक्कादायक घटना ३० जुलै रोजी वाळूज परिसरात घडली. अखेर ५ ऑगस्ट रोजी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश शहाजी यादव (३९, रा. कोरेगाव, जि. सातारा) या तरुणाने एजंट नंदकुमार चव्हाण याच्याशी संपर्क करून लग्नासाठी तयारी दर्शवली होती. चव्हाणने दिशा माधव कदम (२५, रा. आंबेडकरनगर) हिचे स्थळ सुचवले. महेश यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिशा हिला पसंती दिल्यानंतर एजंट मोनिका हिच्या मदतीने १ लाख ८० हजार रुपये ठरले. २९ जुलैला महेश व त्यांच्या नातेवाईकांनी ओमिनी कारने संभाजीनगर गाठले.
३० जुलै रोजी आंबेडकरनगर येथे दिशा हिच्या घरी जाऊन चहापाणी, साडीखरेदी झाली. त्यानंतर वकिलाच्या उपस्थितीत कौटुंबिक न्यायालयात बॉण्डवर सह्या करून लग्नाचे सोपस्कार पार पडल्याचे सांगण्यात आले.
सायंकाळी गावाकडे जात असताना वाळूज परिसरात अचानक एक कार आडवी लावून काही अज्ञातांनी ओमिनी गाडीच्या काचा फोडल्या व चालकाला मारहाण केली. याच गडबडीत नववधू दिशा ही लग्नाचे कागदपत्र आणि ३५ हजार रुपये असलेली बॅग घेऊन त्या कारमधून पसार झाली.
या फसवणुकीनंतर यादव यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. नंदकुमार चव्हाण, मोनिका व दिशा कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक उपनिरीक्षक सुभाष शेवाळे करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*