छत्रपती संभाजीनगर : शहरातील जाधववाडी भाजीमंडईत भाजीपाला विक्रेत्याचा मोबाइल हरवला आणि त्यातून तब्बल २ लाख ३८ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार २८ जुलै ते ४ ऑगस्ट २०२५ दरम्यान घडला असून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अख्तर वजीर खान (वय ४६, रा. फुलंब्री) हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. २७ जुलै रोजी सकाळी सुमारास ते जाधववाडी भाजीमंडईत व्यवसाय करत असताना त्यांचा मोबाइल गहाळ झाला. त्यांनी तत्काळ पोलिसांकडे मोबाइल हरवल्याची तक्रार नोंदवली, मात्र मोबाईलमधील सीम कार्ड त्वरित बंद केले गेले नाही. पोलिसांनीही मोबाइल शोधण्याची पुढाकार घेतली नाही, असे फिर्यादींचे म्हणणे आहे.

दरम्यान, मोबाइल ज्याच्या हाती पडला त्याला अख्तर यांचे मोबाइलमध्ये जतन केलेले आधार कार्ड सापडले. त्याचा वापर करून आरोपीने मोबाइलमधील यूपीआय अॅप सुरु केले आणि बँक खात्यांचा पासवर्ड रिसेट केला. या प्रक्रियेसाठी लागणारा ओटीपी (OTP) हरवलेल्या मोबाइलवरच आल्याने आरोपीला सर्व व्यवहार करण्यास सोपे झाले.

आरोपीने तब्बल २३ ऑनलाइन व्यवहार करत २ लाख ३८ हजार रुपये विविध खात्यांमध्ये वळवले. खात्यात फक्त ८५ रुपये शिल्लक ठेवून आरोपीने पळ काढला. काही दिवसांनी अख्तर यांनी त्याच क्रमांकाचे नवीन सीम कार्ड घेतले तेव्हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना सूचना केली आहे की, मोबाइल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास त्वरित सीम कार्ड बंद करावे आणि संबंधित बँक व यूपीआय सेवा प्रदात्यांना माहिती द्यावी, जेणेकरून अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसू शकेल.

ही घटना डिजिटल व्यवहाराच्या युगात सावधानतेचे महत्त्व अधोरेखित करते. थोडा विलंब, निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष यामुळे आयुष्यभराची कमाई काही मिनिटांत गमवावी लागू शकते.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,598 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क