छत्रपती संभाजीनगर – शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरांची टोळी सक्रीय झाली असून, फक्त १५ मिनिटांच्या अंतरात दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना घडल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी विनाक्रमांकाच्या दुचाकीचा वापर केला असून, एकाच वर्णनाचे आरोपी असल्याने ही कृत्ये एकाच टोळीने केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

ही दोन्ही प्रकरणे ७ ऑगस्ट रोजी रात्री जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पहिली घटना रात्री ७.४५ वाजता उल्कानगरीतील जुनी चौरंगी भागात झाली. सुरेश अनंतराव कुलकर्णी (रा. कासलीवाल विश्व अपार्टमेंट) हे पत्नी राजश्री यांच्यासह दुचाकीवरून जात असताना, विनानंबर दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी राजश्री यांच्या गळ्यातील १० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र तुटलेला काही भाग त्यांच्या बॅगेत अडकला व तेवढाच वाचला.

दुसरी घटना फक्त १५ मिनिटांनी, म्हणजेच रात्री ८ वाजता, बंजारा बारसमोर घडली. सुनील मगनराव शिंदे (४९, रा. गोरक्षनगर, हसूल) हे पत्नी सुनंदा यांच्यासह स्कुटीवरून सेव्हन हिलकडे जात असताना, दोन चोरट्यांनी सुनंदा यांच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची, सुमारे २५ हजार रुपये किंमतीची तुटलेली पोत हिसकावली आणि पसार झाले.

दोन्ही घटनांमध्ये आरोपींचे वर्णन एकसारखे असून, त्यांनी वापरलेली दुचाकीही विनाक्रमांकाची असल्याने पोलिसांनी ही कृत्ये एकाच टोळीने केल्याची शक्यता वर्तवली आहे. या दोन गुन्ह्यांमध्ये एकूण १५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पोती चोरीस गेल्या असून त्यांची अंदाजे किंमत ६० हजार रुपये आहे.

जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास उपनिरीक्षक मारुती खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली त्वरित पोलिसांना कळविण्याची सूचना दिली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,030 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क