छत्रपती संभाजीनगर : इचलकरंजीहून पाच वर्षांपूर्वी शहरात स्थायिक झालेल्या ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिक किशोर राठी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाने घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे तीन जणांचे प्राण वाचले. दोन किडन्या शहरातील दोन रुग्णांना, तर यकृत नागपूर येथील रुग्णाला प्रत्यारोपित करण्यात आले.
घटना ४ ऑगस्ट २०२५ रोजी घडली. किशोर राठी हे शहानूरमियाँ दर्गा परिसरातून जात असताना अचानक चक्कर येऊन दुचाकी घसरली. स्थानिक नागरिक व नातेवाइकांनी तत्काळ त्यांना कमलनयन बजाज रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर मेंदू दुखापत आणि रक्तस्रावामुळे डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले.
याच दरम्यान, शहरातील दोन रुग्ण व नागपूरमधील एका रुग्णाला अवयवांची तातडीची गरज असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आले. ही माहिती राठी यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. मानवतेचा उच्च आदर्श ठेवत त्यांच्या पत्नी सुनीता राठी आणि मुलांनी अवयवदानास संमती दिली. त्यानंतर शहरातील दोन रुग्णांना प्रत्येकी एक किडनी, तर नागपूर येथील रुग्णाला यकृत प्रत्यारोपित करण्यात आले.
या प्रक्रियेत कमलनयन बजाज रुग्णालयातील डॉ. ओसवाल, डॉ. शिवाजी तौर, डॉ. विनोद गोसावी, डॉ. गीता फेरवानी, डॉ. अजय रोटे, डॉ. मिलिंद वैष्णव आणि सीईओ डॉ. जॉर्ज फर्नाडिस यांचे मार्गदर्शन लाभले. अवयवदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडत रुग्णांना नवजीवन देण्यात यश आले.
किशोर राठी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाच्या उदार मनाने घेतलेल्या या निर्णयाचे शहरभर कौतुक होत आहे. रुग्णालयाच्या वतीने राठी यांना मानवंदना देऊन अवयवदानाच्या या प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्यात आला.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*