छत्रपती संभाजीनगर : संभाजी कॉलनी येथील प्रमोद पाडसवान यांच्या निघृण हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी करून आरोपींवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच खटला जलद गती न्यायालयात चालवावा, अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, पाडसवान कुटुंबीयांवर निमोने कुटुंबाकडून सन २०२१ पासून सातत्याने छळ, अतिक्रमण व जीवितास धोका निर्माण केला जात होता. या संदर्भात स्थानिक पोलीस ठाण्यात अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या. २०२१ ते २०२५ दरम्यान किमान नऊ वेळा लेखी तक्रारी करण्यात आल्या असून, अलीकडेच ५ ऑगस्ट २०२५ रोजी पाडसवान कुटुंबाने “हा आमचा शेवटचा पर्याय आहे” असे नमूद करून पोलिसांकडे मदत मागितली होती. तरीदेखील पोलीस यंत्रणेने कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असा आरोपही पत्रात करण्यात आला आहे.
२२ ऑगस्ट रोजी झालेल्या हत्येमुळे केवळ एका कुटुंबावर अन्याय झाला नाही तर कायदा व सुव्यवस्थेवरील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जबाबदार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगात्मक आणि दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास उच्चस्तरीय व निःपक्षपाती पद्धतीने करण्यासाठी SIT नेमण्याची, सर्व तक्रारींची तपासात समाविष्ट करण्याची, आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आणि खटला जलद गतीने चालविण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
निमोने कुटुंबाच्या अतिक्रमण, बेकायदेशीर कृती व राजकीय आश्रयाबाबतही चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*