जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा स्वर अधिक तीव्र करण्याचा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले की येत्या 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे कूच केली जाणार आहे. जर आरक्षणाचा निर्णय झाला नाही, तर सरकार उलथवून टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला.
जरांगे यांनी कूचच्या मार्गाचा तपशील देताना सांगितले की, 27 ऑगस्ट रोजी सकाळी आंतरवाली सराटी येथून निघून महाकाळा, शहागड, शहागड चौक, वडीगंधारी फाटा, डोंगलगाव फाटा, साष्ट पिंपळगाव, बळेगाव, आपेगाव फाटा, हिरडपुरी, आंबेटाकळी, नवगाव, तुळजापूर, वडवळी, आपेगाव माउलींचे, वाघाडी, पैठण, उंचेगाव, पाटेगाव, तळणी, शेवगाव, वडुली, मळेगाव, मिरी नाका, पांढरी पूल, अहिल्यानगर बायपासमार्गे कल्याण फाटा आणि पुढे आळेगाव, नारायण गाव मार्गे ते 27 ऑगस्ट रोजी शिवनेरी गडावर पोहोचतील.
यानंतर 28 ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडावरील पवित्र माती कपाळावर लावून, ऐतिहासिक शिवभावनेने ते राजगुरू खेड मार्गे चाकणला पोहोचतील. पुढे तळेगाव, लोणावळा, पणवेल, वाशी, चेंबूर मार्गे मुंबईकडे प्रस्थान करणार असून 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी ते आझाद मैदानावर पोहोचतील.
29 ऑगस्ट रोजी सकाळपासून आझाद मैदानावर उपोषण सुरू होईल, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. त्यांनी सरकारला अंतिम इशारा देत सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन होईल. यावेळी त्यांनी लाखो मराठा बांधवांना या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले.
मराठा आरक्षण प्रश्न सोडविण्यासाठी आता हा निर्णायक टप्पा असल्याचे जरांगे म्हणाले. “मराठा समाजासाठी आरक्षण हवेच आणि यावेळी आम्ही थांबणार नाही”, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*