छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, आझाद मैदानावर मराठा बांधवांची गर्दी वाढत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली असून, त्यांच्या पाठिशी राज्यभरातून हजारो आंदोलक उभे आहेत. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलन करणाऱ्यांची खाण्यापिण्याची सोय करणे हे मोठे आव्हान ठरले आहे.
हीच जबाबदारी सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक संस्था व ग्रुप स्वीकारत आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील स्वराज्य ग्रुप अग्रभागी असून, त्यांनी आंदोलकांसाठी अन्नसेवा पुरवण्याचे कार्य हाती घेतले आहे. प्रदीप सोळुंके आणि किशोर घोडके यांच्या पुढाकाराने या ग्रुपकडून मुंबईला मोठ्या प्रमाणावर रसद पाठवली जात आहे.
काल रात्रीच ५० हजार लोकांसाठी लागणाऱ्या तिखट पुऱ्या मुंबईत पाठवण्यात आल्या आहेत. “आपल्या समाज बांधवांना आझाद मैदानावर जेवणाची कोणतीही कमतरता भासू नये” या उद्देशाने हे कार्य केले जात आहे.
आझाद मैदानावर मराठा समाजाची ताकद दिवसेंदिवस वाढत असून, राज्यभरातून आंदोलक येत आहेत. उपोषणाचा तिसरा दिवस असूनही मनोज जरांगे पाटील ठाम भूमिकेत आहेत. मराठा समाजासाठी सुरू असलेला हा लढा निर्णायक टप्प्यात पोहोचत आहे. या आंदोलनाला सामाजिक स्तरावरून मोठा पाठिंबा मिळत आहे, आणि स्वराज्य ग्रुपसारख्या संस्थांचे योगदान या लढ्याला बळकटी देत आहे.
हा संघर्ष केवळ आरक्षणासाठी नाही, तर सामाजिक एकतेचे दर्शन घडवणारा आहे. आझाद मैदानावर केवळ घोषणांचा गजर नाही, तर सेवा आणि बांधिलकीची प्रेरणादायी उदाहरणेही उमटत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*