छत्रपती संभाजीनगर : शहराच्या वाढत्या पाणीपुरवठ्याची मागणी पूर्ण करण्यासाठी सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेत २५०० मिमी व्यासाची तब्बल ३८ किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीच्या विविध ठिकाणी जोडण्या करण्याचे मोठे काम १३ ते १८ सप्टेंबरदरम्यान हाती घेण्यात येत असून यासाठी विद्यमान ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी सहा दिवस बंद ठेवावी लागणार आहे. त्यामुळे शनिवारपासून शहराला मिळणारा वाढीव २६ एमएलडी पाणीपुरवठा बंद राहणार असून नागरिकांना कमी पाण्यावर समाधान मानावे लागेल.
नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागूनच अनेक ठिकाणी ९०० मिमीची विद्यमान जलवाहिनी आहे. जोडणीचे काम करताना धक्का लागून ही जलवाहिनी निखळण्याचा धोका असल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून ही जलवाहिनी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या काळात २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीच्या तब्बल १२ ठिकाणी जोडण्या करण्यात येणार असून जायकवाडीत जॅकवेलच्या ठिकाणीही महत्त्वाची जोडणी दिली जाणार आहे.
९०० मिमी व्यासाची जलवाहिनी पाच दिवस बंद राहिल्याने शहराला दररोज होणारा १७० एमएलडी पाणीपुरवठा कमी होऊन १४० ते १४५ एमएलडी इतका होणार आहे. यामुळे पाणीपाळीचे दिवस वाढणार असून अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा विलंबाने होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी या काळात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*