मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी केल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खरीप 2025 मधील नुकसानभरपाई म्हणून तब्बल 2,215 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. मदत व पुनर्वसन विभागाने शासन निर्णयही काढला असून, ही रक्कम आजपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी सर्वाधिक बाधित झाले. सरकारने केलेल्या पंचनाम्यातून 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलली आहेत.

जून ते ऑगस्टमधील पिकांच्या नुकसानीसाठी मदत
जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील पिके उध्वस्त झाली. शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. या पार्श्वभूमीवर आजपासून सुरू होणारी नुकसानभरपाई शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. राज्यातील सर्वाधिक बाधित भागांमध्ये मदतीचा समावेश करण्यात आला असून, तात्काळ दिलासा मिळण्यासाठी यंत्रणांना आदेश देण्यात आले आहेत.

विभागनिहाय मदतीचे वाटप
सरकारकडून नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात छत्रपती संभाजीनगर विभागाला 721 कोटी, नाशिक विभागाला 13.77 कोटी रुपये देण्यात आले. तर ऑगस्टमध्ये पुणे विभागाला 14.29 कोटी, नागपूर विभागाला 23.85 कोटी, अमरावती विभागाला तब्बल 565.60 कोटी, आणि कोकण विभागाला 10.53 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. आतापर्यंत खरीप हंगामासाठी सरकारने एकूण 2,200 कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित केली आहे.

शेतकऱ्यांना पैसे पोहोचण्यासाठी काही दिवस लागणार
मदतीची प्रक्रिया वेगवेगळ्या शासन निर्णयांच्या माध्यमातून सुरू असून, आतापर्यंत 2,215 कोटी रुपयांपैकी 1,829 कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. मात्र सर्व शेतकऱ्यांना पूर्ण मदत पोहोचण्यासाठी दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या निर्णयामुळे नुकसानीच्या छायेत अडकलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असून, खरीप हंगामातील तुटीची भरपाई करण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KlbV2BdtEZ4Fbi6usVHmPo?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,400 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क