छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिकलठाणा वेधशाळेच्या माहितीनुसार, अवघ्या २४ तासांत तब्बल ८६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात काल दिवसभरात २८ मिमी पाऊस तर गुरुवारी रात्री ५८ मिमी पाऊस कोसळल्याने शहरात पाणी साचले.

सिडको, गुलमोहोर कॉलनी, उस्मानपूरा, शाहगंज आणि बायजीपुरा परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली. काही ठिकाणी वाहनचालकांना कंबरभर पाण्यातून वाहनं हाकावी लागली. पावसामुळे नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने अनेक घरे व दुकानांत पाणी घुसले.

दरम्यान, सततच्या पावसामुळे हर्सूल तलाव ओव्हरफ्लो झाला असून पाटबंधारे विभागाने पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील इतर अनेक तलावांनाही पाण्याचा ओव्हरफ्लो होऊ लागला आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेल्याने ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे, विशेषतः निचांकी भागातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

शहर व जिल्ह्यातील पावसाने जरी थोडा दिलासा मिळवून दिला असला, तरी पाणी साचल्याने व नदी-नाल्यांना पूर आल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. वाहतुकीची कोंडी, पिकांचे नुकसान आणि गावांचा तुटलेला संपर्क यामुळे प्रशासनाला मोठे आव्हान उभे राहिले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KlbV2BdtEZ4Fbi6usVHmPo?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,925 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क