छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील जायकवाडी धरण क्षेत्रात तसेच अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे धरणातून तब्बल दोन लाख २६ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या प्रचंड विसर्गामुळे पैठण शहरात पाणी घुसण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पैठण तालुक्यातील नदीकाठच्या १३ गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. उपविभागीय अधिकारी निलीमा बाफना यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून गावकऱ्यांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २००६ साली दोन लाख क्युसेक वेगाने पाणी सोडल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. तोच अनुभव लक्षात घेऊन यावेळी आधीच खबरदारीची पावले उचलण्यात येत आहेत. पैठण शहरातील सखल भागातील नागरिकांनाही हलवले जात असून आमदार विलास भुमरे स्वतः या कामात सहभागी झाले आहेत.
दरम्यान, वैजापूर तालुक्यातील नारायणपूर आणि गोपाळवाडी या गावांत पाणी शिरल्याने नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. वैजापूर शहरातील सुमारे २० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जायकवाडी धरणातून नियमित आणि आपत्कालीन दरवाज्यातून एक लाख २५ हजार क्युसेक पाणी सोडले गेले असून, पावसाची आवक कायम राहिल्यास पैठण शहरात रात्रीपर्यंत पाणी घुसण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतशिवार पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, प्रशासन सतर्क आहे व आवश्यकतेनुसार अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येईल.
मराठवाड्यातील १९८ मंडळांत अतिवृष्टी नोंदविण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून, मुख्यमंत्री स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाशी संपर्कात राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KlbV2BdtEZ4Fbi6usVHmPo?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*