छत्रपती संभाजीनगर : म्हाडातर्फे यंदाचा दसरा संभाजीनगरकरांसाठी गोड ठरणार आहे. विजयादशमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच बुधवार, १ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील विविध भागांतील तब्बल १,२४९ सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीसाठी एकूण ८,६४३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी अंतिम तारखेपर्यंत रकमेसह ७,८८१ नागरिकांनी अर्ज सादर करून सहभाग निश्चित केला आहे.
सोडतीत सर्वाधिक अर्ज चिकलठाणा येथील म्हाडाच्या ६ रेडी पझेशन सदनिकांसाठी आले असून तब्बल ७०० नागरिकांनी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे एकास ११६.६ इतकी स्पर्धा निर्माण झाली आहे. सातारा येथील आनंद पार्क परिसरात अल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या १८ प्लॉटसाठी १,२१४ अर्ज आले आहेत. येथे एकास ६७.४४ इतका दर आहे. अंबाजोगाई येथील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी असलेल्या ९२ सदनिकांसाठी ११७ अर्ज प्राप्त झाले आहेत.
या योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपर्यंत असलेल्या व्यक्तींना नक्षत्रवाडी येथे फक्त १२ लाखांत वन बीएचके फ्लॅट उपलब्ध होणार आहेत. पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत या घरांचे वाटप केले जाणार आहे. विमानतळासमोर म्हाडाचे फ्लॅट २७ ते ३४ लाख रुपयांदरम्यान उपलब्ध आहेत. म्हाडाची घरे ‘मलेशियन माय वन’ तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली असून अॅल्युमिनियमच्या वापरामुळे कामाचा कालावधी ५० टक्क्यांनी कमी झाल्याचे म्हाडाचे कार्यकारी अभियंता नितीन शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, चिकलठाणा येथील म्हाडाच्या जागेवर बांधलेली १४८ घरे व मिनीघाटीच्या मागील भागात ६ घरे रेडी पझेशन स्वरुपात नागरिकांना देण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. या सर्व सोडतीतून सहभागी अर्जदारांकडून एकूण ११ कोटी ६४ लाख ६८ हजार ५५६ रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे म्हाडाची ही सोडत यंदा मोठ्या प्रमाणावर उत्सुकतेचा विषय ठरत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ii8cI59VTTI77JxAW1zpnq?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*