छत्रपती संभाजीनगर :  मराठवाड्यातील शेतकरी व कामगारांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मंगळवारी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयावर धडक दिली. सुरूवातीला आयुक्तालयासमोर घोषणा देत निदर्शने करण्यात आली. मात्र दुपारी दोनच्या सुमारास शेकडो शेतकरी व कामगारांनी अचानक आयुक्तालयात घुसखोरी केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आंदोलकांनी आत ठिय्या देऊन प्रशासनाशी चर्चा सुरू केली आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी केले. त्यांच्या सोबत अखिल भारतीय किसान सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन, महाराष्ट्र अखिल भारतीय शेतमजूर यूनियन यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा सचिव ऍड. कॉ. भगवान भोजने, कॉ. लक्ष्मण साक्रुडकर, ऍड. सचिन गंडले, कॉ. प्रकाश पाटील, सीटूचे कॉ. अजय भवलकर, कॉ. भाऊसाहेब झिरपे, कॉ. लोकेश कांबळे, कॉ. अरुण मते आदींनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

आंदोलकांनी प्रशासनापुढे दहा ठोस मागण्या केल्या आहेत. त्यात मराठवाड्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना प्रति एकर ५० हजार रुपये पीकनुकसान भरपाई द्यावी, शेतमजुरांना व कामगारांना मासिक ३० हजार रुपये श्रमनुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी लागू करावी, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सुधारणा करावी, तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते, पूल, तलाव, वीजपुरवठा व्यवस्था यांच्या दुरुस्तीकरिता विशेष कार्यक्रम हाती घ्यावा, अशा मागण्या आहेत.

याशिवाय वाहून गेलेल्या जमिनी व पशुधनासाठी बाजारभावाप्रमाणे भरपाई, पडझड झालेल्या घरांसाठी मदत, तसेच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची फी माफ करण्याचाही समावेश आहे. आंदोलक ठाम आहेत की मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. सध्या आयुक्तालय परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रशासन व आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Ii8cI59VTTI77JxAW1zpnq?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

663 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क