छत्रपती संभाजीनगर : अनुकंपा तत्त्वावरील गट क व गट ड तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सरळसेवा भरतीद्वारे निवड झालेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३०३ उमेदवारांना आज (शनिवार) समारंभपूर्वक नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. हा सोहळा संत एकनाथ रंगमंदिर येथे पार पडला. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
राज्यभरात एकाच दिवशी एकूण १० हजार ३०९ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली असून, मुंबई येथे झालेल्या मुख्य समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. हा मुख्य कार्यक्रम दूरदर्शन प्रणालीद्वारे थेट प्रसारित करण्यात आला.
या प्रसंगी आमदार अनुराधा चव्हाण, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार तसेच विविध प्रशासकीय विभागप्रमुख उपस्थित होते.
नवनियुक्त उमेदवारांशी संवाद साधताना पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले, “शासनाने अवलंबिलेल्या नव्या कार्यपद्धती आणि सुधारित नियमांमुळे अनेकांच्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीची प्रलंबित प्रकरणे मार्गी लागली आहेत. अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना आज न्याय मिळाला आहे. इतक्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.”
ते पुढे म्हणाले, “प्रत्येक शासकीय सेवकाने आपले कर्तव्य पार पाडताना जनतेच्या सेवेला प्राधान्य द्यावे. अनुकंपा तत्त्वावर ज्यांना नोकरी मिळाली आहे, त्यांनी आपल्या कुटुंबासह समाजाची जबाबदारी ओळखून काम करावे. शासकीय नोकरी ही केवळ रोजगार नसून लोकसेवेची सुवर्णसंधी आहे.”
आमदार अनुराधा चव्हाण यांनीही नव्या उमेदवारांचे स्वागत करत, “शासनाच्या कार्यात प्रामाणिकपणे योगदान द्या आणि जनतेच्या सेवेतून समाधान मिळवा,” असे आवाहन केले.
या समारंभात नवनियुक्त कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसत होता.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ii8cI59VTTI77JxAW1zpnq?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*