छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सणाच्या दिवशी जुन्या वादातून एका २७ वर्षांच्या तरुणाचा भररस्त्यात चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना मुकुंदवाडी परिसरात सोमवारी (दि. २० ऑक्टोबर) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. विपुल मधुकर चाबुकस्वार (वय २७, रा. तोरणगडनगर, सिडको) असे मृत तरुणाचे नाव असून, आशिष गौतम चौथमल (रा. मुकुंदवाडी) आणि सुबोध भास्कर देहाडे (रा. मुकुंदवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विपुलने रामनगर परिसरात फटाक्यांचे दुकान सुरू केले होते. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तो दुकान बंद करून मित्र अजय वाघसोबत गप्पा मारत होता. सिगारेट घेण्यासाठी मुकुंदवाडीच्या दिशेने निघाल्यावर आरोपी आशिष आणि सुबोध हे तेथे आले. जुन्या वादातून दोघांनी विपुलशी वाद घातला. या वादात आशिषने धारदार चाकूने थेट विपुलच्या छातीत वार केला.
मारल्यावर आला भानावर
छातीत खोलवर चाकू खुपसल्याने विपुल बेशुद्ध पडला. तो काहीच प्रतिसाद देत नसल्याचे पाहून हल्लेखोर सुबोध भानावर आला. त्याने विपुलला आपल्या दुचाकीवरून खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र तेव्हाच विपुलचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन्ही हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.
घटनेचा संपूर्ण प्रकार जवळील पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. काही तासांतच आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना २५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या हत्याकांडामुळे मुकुंदवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*