छत्रपती संभाजीनगर : वाळूज औद्योगिक वसाहतीतील गुड इयर कंपनीसमोर बुधवारी (दि. 22 ऑक्टोबर) सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील सिद्धार्थ वसंतराव खरात आणि नितीन भाऊसाहेब खरात (दोघेही रा. भोकरदन, सध्या मुक्काम वडगाव को. बजाजनगर) व त्यांच्यासोबत असलेला आणखी एक युवक (नाव व गाव अद्याप अज्ञात) हे तिघे दुचाकी (क्रमांक एमएच 14 यू 3759) वरून वाळूज औद्योगिक वसाहतीतून घाणेगावकडे जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले आणि वाहनाच्या चाकाखाली चिरडले गेले.
या भीषण अपघातात सिद्धार्थ खरात आणि नितीन खरात हे दोघे जागीच ठार झाले, तर तिसरा युवक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच समाजसेवक मनोज जैन तसेच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाडे, उपनिरीक्षक विनोद अबुज, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गीते व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमीला तात्काळ खाजगी वाहनाने घाटी रुग्णालयात दाखल केले.
या अपघाताबाबत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*