छत्रपती संभाजीनगर : लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात फटाके फोडण्याच्या उत्साहात काही ठिकाणी वाद आणि हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. शहरातील उस्मानपुरा, बनेवाडी आणि छावणीतील नंदनवन कॉलनी या भागांमध्ये एकूण चार स्वतंत्र गुन्हे पोलिस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आले आहेत. या सर्व घटनांमध्ये किरकोळ वादातून मारहाण, मोबाईल चोरी आणि धोकादायक रितीने फटाके फोडल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

कबीरनगरमध्ये समजावण्यावरून मारहाण

पहिली घटना उस्मानपुरा परिसरातील कबीरनगर येथे घडली. २१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री शशीकांत आढाव यांनी शेजारील व्यक्तीला घरासमोर मोठ्या आवाजात फटाके फोडू नये, असे समजावून सांगितले. त्याचा राग मनात धरून संबंधितांनी टोळक्यासह त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी दांड्याने मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी साहिल जावळे, प्रवीण वाहुळ उर्फ दादाराव, आदर्श वाहुळ आणि एका महिला आरोपीवर उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनेवाडीत शेजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी

तिसरी घटना बनेवाडी भागात लक्ष्मीपूजनानंतर रात्री एक वाजेच्या सुमारास घडली. शेजाऱ्यांमध्ये एकमेकांच्या दारात फटाके फोडण्यावरून वाद निर्माण झाला आणि तुंबळ हाणामारी झाली. फिर्यादी शारदा पवार यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलाने घरासमोर फटाके फोडल्याचा राग धरून आरोपींनी घरात घुसून मारहाण केली. याप्रकरणी ५० वर्षीय महिला आरोपी, आकाश मदन पवार आणि गणेश मदन पवार यांच्यावर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदनवन कॉलनीत धोकादायक फटाके; आगीचा प्रसंग टळला

सर्वात गंभीर घटना छावणी परिसरातील नंदनवन कॉलनीत घडली. २१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजता काही तरुणांनी कार रस्त्यावर उभी करून त्यातील पेट्रोल बाहेर काढले आणि रस्त्यावर टाकून त्यावर फटाके फोडले. त्यामुळे परिसरात आगीचे लोट उठू लागले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. धोकादायक रितीने फटाके फोडल्याने अनेकांचे जीवन धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली. या प्रकरणी स्वप्नील तेजराव गंगावणे (२५, एकता नगर), अजय विजय गवळी (२४, टाऊन हॉल), प्रणीत भाऊसाहेब साळवे (२५, नंदनवन कॉलनी), रोहित गौतम साळवे (२४, टाऊन हॉल) आणि सागर सुनील प्रधान (टाऊन हॉल) यांच्यावर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या चारही घटनांमुळे सणासुदीचा आनंद गोंधळात बदलल्याचे चित्र दिसून आले. पोलिसांनी सर्व ठिकाणी गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला असून, नागरिकांनी सणाच्या आनंदात संयम पाळण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,669 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क